मुंबई : येत्या २४ जुलै रोजी होणाऱ्या नीटची तयारी करण्यास विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक अभ्यास केंद्र सरकार उघडणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.वैद्यकीय व दंतवैद्यक अभ्यासक्रमासाठी नीटद्वारेच प्रवेश होतील, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण आलेला आहे. यासंदर्भात बुधवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडे यांनी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला कसे अभ्यास केंद्र सुरू करायचे, यासाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार आणि वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांची समिती तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय अभ्यासक्रमात काय असावे, कोणत्या मान्यवरांचे मार्गदर्शन वर्ग ठेवावेत, यासाठी एसएससी बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे सुधीर व्यास यांंच्यासह काही तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या दोन्ही समित्यांना तातडीने नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले.मुंबई महापालिकेत व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. अनेक गेस्ट लेक्चर्स आयोजित केली जातात. त्याचाही कसा वापर यासाठी करता येईल याचीही आज चाचपणी करण्यात आली. शिवाय सह्याद्री दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांची दुपारची वेळ घेऊन त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसा अभ्यास करायचा, याविषयी मार्गदर्शन करण्याचे नियोजन चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
सरकार लागले अभ्यासाला !
By admin | Published: May 12, 2016 3:25 AM