आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 13 - ‘राज्यातलं महायुतीचे सरकार स्थिर आहे. शिवसेना आमच्यासोबतच आहे. पाच वर्षे आमच्या ताकदीवर आमचे सरकार टिकेल, काँग्रेसच्या मेहरबानीवर नाही, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून शेतकरी कर्ज माफीचा मुद्दा पुढे करून संघर्ष यात्रा काढण्याचे नाटक केले जात आहे,’ असा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या आघाडी सरकारने जी पंधरा वर्षांत पापे केली, त्याचे धनी भाजपला केले जात असल्याची टीका करून मंत्री बापट म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे लाट क्षणिक असल्याचे सांगत होते. ती येते आणि जाते, असेही म्हणत होते. पण नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले यश हे कार्यकर्त्यांनी मिळविले आहे. हे त्यांनी विसरू नये.’
‘आघाडी शासनाच्या काळात शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली होती. तेच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत. शेतकºयांच्या प्रश्नाचं राजकारण करून भाजपवर वार करणाºयांचे मुद्दे संपले आहेत. त्यामुळे आपल्या हातात काहीच राहिले नाही, हे ओळखून संघर्ष यात्रेचे नाटक केले आहे. शेतकºयांना कायमस्वरुपी उभे करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे,’ असेही मंत्री बापट यांनी सांगितले.
दरम्यान, ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा ३७ वा वर्धापन दिन झाला. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सर्वत्र जाऊन पक्षविस्ताराचे काम हाती घेणार आहे. सातारा जिल्ह्यातून ३०० विस्तारक जिल्ह्याबाहेर जाऊन लोकांमध्ये जनजागृती करणार आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष सुनील काळेकर, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, नगरसेवक धनंजय जांभळे, विजयकुमार काटवटे, मिलिंद काकडे, सुवर्णा पाटील, दत्ताजी थोरात आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.