पुणे : ‘‘आज सामान्य माणूस हा आर्थिक आणि मानसिक स्थितीमुळे दवाखान्याची पायरी चढत नाही. जपानमध्ये सरकारच नागरिकांच्या औषधांचा खर्च करते. मात्र, महाराष्ट्राचं सरकारच सध्या ‘औषधावर’ आहे, असे मिश्कीलपणे सांगत राज्यात शासनातर्फे जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येतील, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पुणे न्यूरोसायन्सेस ट्रस्ट संचालित ‘समवेदना’ संस्थेच्या वतीने सुखसागरनगर येथे सुरू करण्यात आलेल्या ‘क्लिनिक’चे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. चारुदत्त आपटे, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी प्रीती दामले, प्रकाश तुळपुळे, बापू पोतदार, डॉ. शिवाजीराव सरोदे, राजीव साबडे उपस्थित होते. वैद्यकीय सेवेच्या प्रथा आणि परंपरेपासून सामान्य माणसाची नाळ तुटत चालल्याचे सांगून बापट म्हणाले, आज ९० टक्के डॉक्टर व्यवसायाबरोबरच उर्वरित पैशामध्ये सामाजिक उपक्रम राबवित आहेत. तरीही आज औषधांच्या अवाढव्य किमती आणि उपचारांच्या न परवडणाऱ्या खर्चामुळे सामान्य माणूस डॉक्टरांकडे जाण्यास धजावत नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे कितीतरी रुग्ण आहेत, जे डॉक्टरांकडे गेले असते तर वाचले असते. म्हणून जेनरिक औषधे जास्तीतजास्त बाजारात येणे आवश्यक आहे. यासाठी जेनरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ मिळालेल्या मंगला दहिभाते यांनी मनोगत व्यक्त केले. या क्लिनिकची संपूर्ण जबाबदारी घेतलेल्या डॉ. माधुरी आंबास्कर यांचा सत्कार करण्यात आला. प्रीती दामले म्हणाल्या, ‘‘गेल्या १३ वर्षांपासून समवेदना संस्थेच्या माध्यमातून गरिबांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्याबरोबरच कॅन्सर तपासणी, वस्तीपातळीवर आरोग्य प्रशिक्षण शिबिरे राबविली जातात. या क्लिनिकमध्ये ५० रुपये इतक्या कमी दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच तपासणी, पॅथॉलॉजी टेस्ट, एक्सरे, ईसीजी अशा सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून हे क्लिनिक सुरू होईल.’’
जेनरिक औषधांची राज्यात शासकीय दुकाने सुरू होणार
By admin | Published: February 13, 2016 3:17 AM