विशेष प्रतिनिधी मुंबई : खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारला दिलेला पाठिंबा सोमवारी काढला. तसे पत्र शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून दिले. शेट्टी यांच्या पक्षाचा एकही विधानसभा सदस्य नाही.शेट्टी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेलेले महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. त्यांच्या राजीनाम्यावर योग्य वेळी निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतक-यांच्या प्रश्नांची राज्य सरकारला चिंता वाटत नाही. सरकारकडून आमची घोर निराशा झाली असल्याने पाठिंबा काढण्याचा निर्णय घेत असल्याचे खा. शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकारने वेळोवेळी प्रत्येक घटकाशी चर्चा करण्याचीच भूमिका घेतली आहे. आपल्याशी चर्चेची सरकारची तयारी असेल, असे मुख्यमंत्र्यांनी शेट्टी यांना सांगितले.सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद मात्र कायम -विधान परिषदेचे सदस्य असलेले सदाभाऊ खोत हे राज्यमंत्री आहेत. त्यांना ‘स्वाभिमानी’तून निलंबित करण्याचा निर्णय अलीकडेच घेण्यात आला होता. मात्र सदाभाऊ खोत हे राज्यमंत्रिपदी कायम राहणार आहेत.
‘स्वाभिमानी’ने काढला सरकारचा पाठिंबा, राजू शेट्टी मुख्यमंत्र्यांना भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:41 AM