लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीतील घोटाळा, एसआरए प्रकल्पाच्या मुंजुरीतील अनियमितता आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सोमवारपासून सुरु होणा-या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या स्वतंत्र पत्रकार परिषद सांगितले.अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कॉंग्रेस-राष्ट्रवादीत बेबनाव झाला असला तरी प्रत्यक्ष अधिवेशन काळात विविध मुद्यांवरून दोन्ही पक्षाचे नेते सरकारवर तूटून पडणार आहेत. शेतक-यांची फसवणूक, एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहार, शिक्षणाचा उडालेला बोजवारा, कुपोषणाची समस्या आदी मुद्यावर सरकारला जाब विचारु, असे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. एकीकडे कर्जमाफीवरुन शेतक-यांची फसवणूक केली जात आहे. तर, दुसरीकडे राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी एका विकासकावर केलेली कृपादृष्टी कागदपत्रांसह समोर आली आहे. सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे दिसून येते. या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांची मान्यता असल्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी नमूद केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. या घोटाळ्यातही मुख्यमंत्री संबंधितांना क्लीन चीट देणार की कारवाई करणार, असा प्रश्न विखे पाटील यांनी केला. याप्रसंगी सपाचे अबु आझमी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आमदार जोगेंद्र कवाडे, जनता दलाचे आमदार कपिल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, विजय वडेट्टीवार, आदी उपस्थित होते. सरकारचा कारभार गोल, गोल...!शेतक-यांची सरसकट कर्जमाफी, शेतीमालालला हमीभाव, नेवाळे येथील शेतकरी आंदोलनात पॅलेट गनचा वापर आदी प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, असे सांगत ‘राज्य सरकारचा सगळा कारभार गोल, गोल आहे. त्यात मोठा झोल आहे. त्यामुळे सरकारवर जनतेचा भरोसा राहिला नाही’, अशी टीका धनंजय मुंढे यांनी केली. यावेळी सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते. अद्याप एकही शेतकरीला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही पण जाहीरातबाजीवर ३६ लाख रूपये खर्च करण्यात आले. कर्जमाफीबाबत जिल्हानिहाय आकडेवारी जाहीर करण्याची सरकारची तयारी नाही. कर्जमाफीसाठी निधीची तरतूद कशी करणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्य केले आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंडे यांनी केली.शिवसेनेवर निशाणाशिवसेना आता ढोल वाजवते पण आता शिवसेनेसमोर ढोल वाजवायची वेळ आली. शेतक-यांचा इतकाच कळवळा असेल तर मुंबई महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्यापैकी ३० हजार कोटी शिवसेनेने द्यावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली. तर, ज्या तत्परतेने मनपाचे अधिकारी मलिष्काच्या घरी तपासणीसाठी पोहोचले, तितक्यात तत्परतेने कधी मातोश्रीवर गेले आहेत का, अशी विचारणा विखे-पाटील यांनी केली. आता शिवसेनाही एक एफएम रेडिओ बनली आहे. ‘शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल आहे; म्हणूनच त्यांची भूमिका गोल-गोल आहे’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला.
कर्जमाफीवरून सरकारची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 5:12 AM