सनदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी सरकारकडून बदल्यांचे अस्त्रः सचिन सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:28 PM2018-04-16T21:28:26+5:302018-04-16T21:28:26+5:30
बहुतांश सनदी अधिका-यांच्या बदल्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केल्या गेल्या आहेत.
सनदी अधिका-यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागावे याकरिता त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच सरकारतर्फे बदली हे अस्त्र म्हणून वापरले जात आहे अशी कठोर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
या संदर्भात निषेध व्यक्त करून सावंत म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून बहुतांश सनदी अधिका-यांच्या बदल्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केल्या गेल्या आहेत. सनदी अधिका-यांना त्यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांना त्या पदावर किमान दोन वर्ष पूर्ण करून दिली पाहिजेत असा नियम असताना अनेक सनदी अधिका-यांना एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करून दिला जात नाही. आजच सरकारने राज्यातील २५ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पदावर एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण न केलेल्या अधिका-यांचाही समावेश आहे. गेल्या चार वर्षातील शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे आकडे पाहिले तर तो जागतिक विक्रम ठरेल असा टोला लगावून हा अधिकाऱ्यांना सरकारचे बोलके बाहुले बनवण्याचा प्रयत्न आहे असे सावंत म्हणाले.