सनदी अधिका-यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागावे याकरिता त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच सरकारतर्फे बदली हे अस्त्र म्हणून वापरले जात आहे अशी कठोर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.या संदर्भात निषेध व्यक्त करून सावंत म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून बहुतांश सनदी अधिका-यांच्या बदल्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केल्या गेल्या आहेत. सनदी अधिका-यांना त्यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांना त्या पदावर किमान दोन वर्ष पूर्ण करून दिली पाहिजेत असा नियम असताना अनेक सनदी अधिका-यांना एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करून दिला जात नाही. आजच सरकारने राज्यातील २५ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पदावर एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण न केलेल्या अधिका-यांचाही समावेश आहे. गेल्या चार वर्षातील शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे आकडे पाहिले तर तो जागतिक विक्रम ठरेल असा टोला लगावून हा अधिकाऱ्यांना सरकारचे बोलके बाहुले बनवण्याचा प्रयत्न आहे असे सावंत म्हणाले.
सनदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी सरकारकडून बदल्यांचे अस्त्रः सचिन सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 9:28 PM