नागपूर : प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्ती- विनाश याची कारणमीमांसा करण्याचे, तसेच व्यक्ती-समाज-राष्ट्राने कुठल्या दिशेने जावे याची मूल्ये सांगण्याचे कार्य वेदांनी केले आहे. वेद चिरंतर आहेत. जगात शाश्वत विकासाची चर्चा होत असताना, प्रकृतीचे शोषण करू नये हे वेदांनी फार पूर्वीच सांगितले आहे. वेदातील वैज्ञानिक विचारांचा जगभरात प्रचार - प्रसार व्हावा. यासाठी वेदांच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.धर्मसंस्कृती महाकुंभात महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने वेद महर्षी विनायकभट्ट घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपुरात अखिल भारतीय वेद संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. संमेलनाला ज्योतिषपीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्री देवनाथपीठाचे जितेंद्रनाथ महाराज, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र मुळे, वेदाचार्य घैसास गुरुजी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर मिश्र आदींची प्रमुख उपस्थिती होती. वेद हे विश्वाचे आद्य वाङ्मय आहे. वेदांना समाजमान्य करण्यासाठी वैदिक विषयांमध्ये संशोधन करणारी व्यवस्था निर्माण करायला हवी. वेदांमध्ये विज्ञानाचे विषय आहेत. त्याची चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी संस्कृत अकादमीची घोषणा केली आहे. त्यातच वेदांच्या संशोधनाचे केंद्रसुद्धा स्थापन व्हावे, अशी अपेक्षा डॉ. उमा वैद्य यांनी या वेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
वेदांच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्न करेल
By admin | Published: December 24, 2016 4:46 AM