मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना यापुढे थेट पुस्तके न देता पुस्तकांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याच्या आशयाचे परिपत्रक काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागातर्फे काढण्यात आले होते. पण आता घूमजाव करत सरकारच विद्यार्थ्यांना पुस्तके देणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी जाहीर केले. बालभारतीची पुस्तके ही सरकारच विद्यार्थ्यांना देणार आहे. पण विद्यार्थ्यांना लागणाऱ्या अन्य पुस्तकांसाठी खाते उघडण्यास सांगितले असल्याचे स्पष्टीकरण तावडे यांनी दिले. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा शोध घेण्यासाठी जानेवारी महिन्यात सोमवारी सेल्फी काढून पाठवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पण या निर्णयाला शिक्षक, प्राध्यापकांनी विरोध केल्यावर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पुस्तकाच्या मुद्द्यावरुन तावडेंना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पुस्तके देण्यात येत होती. पण काही दिवसांपूर्वी शाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये पुस्तकाचे पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत, असे लिहिले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत, शेड्युल्ड किंवा ग्रामीण बँकेत खाते उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्याचे काम हे शिक्षक आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकवर्गातून, मुख्याध्यापक आणि स्वयंसेवी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी या संदर्भात शिक्षणमंत्री तावडे यांच्याकडे या प्रकरणाची विचारणा केली असता, परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचा खुलासा त्यांनी केला. राज्यातील विद्यार्थ्यांना बालभारतीची पुस्तके आधीप्रमाणेच शाळेत देण्यात येणार आहेत. या पुस्तकांचे पैसे कोणत्याही बँक खात्यात जमा करण्यात येणार नाहीत. बालभारतीची पुस्तके सरकारच छापते. त्यामुळे ती थेट विद्यार्थ्यांना देण्यात येतील, त्याचे पैसे देण्याचा प्रश्नच नाही. पण या पुस्तकाव्यतिरिक्त काही पुस्तके विद्यार्थ्यांना लागतात. त्यामुळे त्या पुस्तकांचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे भविष्यात ठेकेदारी बंद होईल, असे मत शिक्षणमंत्री तावडे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
सरकारच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके देणार
By admin | Published: January 19, 2017 2:42 AM