मुंबई : वरळी येथून हिट अँड रनच्या घटनेमुळे मुंबई हादरली आहे. कोळी दाम्पत्य मच्छी आणण्यासाठी ससून डॉक येथे गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना पहाटे ५.३० च्या सुमारास भरधाव कारने या दाम्पत्याला धडक दिली. वरळीच्या अटरिया मॉल परिसरात ही घटना घडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाला आहे. याप्रकरणी आरोपी चालक हा शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाह असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी मिहीर शाह आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत झालेला अपघात हा दुर्दैवी आहे. या घटनेत जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या घटनेतील आरोपी कोणीही असू दे, सरकार त्याला पाठीशी घालणार नाही. या सरकारमध्ये कायदा सर्वांसाठी समान आहे. मग, तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी सरकार आणि गृह विभाग नक्कीच योग्य त्या उपाययोजना करतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच, सध्या घडीला विरोधी पक्षाकडे कुठलेही काम राहिले नाही. त्यामुळे या घटनेमध्ये असे समजण्याचे कुठलेही कारण नाही की, कोण कोणाला पाठीशी घालत आहे. तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी सर्वांना समान न्याय देण्याची आमची मनीषा आहे. राज्यातलं सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. कोणी कितीही आरोप केले तरी त्यात फार अर्थ नाही, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस स्थानकात जाऊन माहिती घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सकाळी वरळीत हिट अँड रनची घटना घडली. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. या घटनेतील चालक फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याला पकडण्याची कारवाई सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तसेच, राजेश शहा कोण आहे, ही माहिती तुम्ही घ्या, मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. कोणी कोणत्याही पक्षात असलं, तरी मी राजकीय वळण देणार नाही. या घटनेत राजकीय हस्तक्षेप नको, असे सांगत एक भारताचा नागरिक म्हणून आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यातदरम्यान, वरळीतील हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात झाला त्यावेळी राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह गाडी चालवत होता. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकटवर्तीय देखील मानले जातात. पोलिसांनी मिहीर शाह आणि चालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.