NCP Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला आज सभागृहात दिलेल्या उत्तरादरम्यान शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. "शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे. पण ही सुविधा निर्माण करुन देण्याची जबाबदारी सरकारची आहे. म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणार आहोत. येत्या दोन वर्षात ५०० कोटी निधी आपण यासाठी खर्च करणार आहोत. एआय तंत्रज्ञान (कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर) येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देईल आणि त्यातून महाराष्ट्रातला शेतकरी समृद्ध होईल," असं अजित पवार म्हणाले.
कृषी विकासाविषयी बोलताना अजित पवार यांनी पुढे म्हटलं की, "कृषीचा २०२३ चा विकास दर ३.३ टक्के होता. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक ताकद दिली, त्यामुळे २०२४-२५ चा कृषीचा विकास दर ८.७ टक्क्यांवर गेला. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञान, जलयुक्त शिवार, एक तालुका एक बाजारपेठ, सिंचनासाठी नदीजोड प्रकल्प, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवड, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड यासारख्या कार्यक्रमांसाठी तरतुदी केलेल्या आहेत," अशी माहिती पवार यांनी दिली.
दरम्यान, "राज्यात ४५ लाख कृषीपंपांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. कोरोनात सर्वच क्षेत्रांची कामगिरी ढासळली होती. फक्त कृषी क्षेत्राने राज्याला तारलं होते. शेती हा राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमातील महत्वाचा घटक आहे. म्हणूनच या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी ९ हजार ७०० कोटीची भरीव तरतूद केली आहे," असंही अजित पवार म्हणाले.