मुंबई- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून त्यांचे अनेक दिल्ली दौरे झाले आहेत. दरम्यान, आज एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यावर विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खोचक टीका केली.
'सरकारचे निर्णय दिल्लीतून होतात'आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहे, त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा आहे. यावर अजित पवार म्हणाले की, 'काँग्रेस सरकारच्या काळात सर्व निर्णय दिल्लीतून व्हायचे. भाजप सरकारचे निर्णय दिल्लीतच झाले. पण, राष्ट्रवादीचे निर्णय मुंबईतून होतात, कारण शरद पवार मुंबईत असतात. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही निर्णय मुंबईत व्हायचे. पण, आता शिंदे यांचे निर्णय दिल्लीतून होताहेत,' अशी टीका अजित पवार यांनी केली.
अजित पवार-एकनाथ शिंदे भेटआज अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. याबाबत विचारण्यात आल्यावर पवार म्हणाले की, 'राज्यातील विकास कामांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तार लवकर केला, तर पालकमंत्री विकासकामांचा आढावा घेऊ शकतात हे त्यांना सांगितलं. अधिवेशन लवकर घेण्याची मागणीही केली,' असे पवार म्हणाले.