लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषिपंपाच्या थकीत वीजबिलामुळे सुरू असलेली कारवाई तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी विरोधकांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण केला. थकबाकीसह चालू बिल दाखवून वसुली सुरू आहे. बिले भरली नाहीत, तर कनेक्शन तोडली जातात, सरकार चालू वीजबिलात चालुगिरी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर, या गोंधळातच इतर कामकाज आटोपते घेत, नंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. आमदार कुणाल पाटील, नाना पटोले यांच्यासह इतर आमदारांनी लक्षवेधी मांडली होती. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन करण्याचा आग्रह विरोधकांनी धरला. मात्र, विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सूरज जाधवच्या आत्महत्येचे पडसादसोलापूर जिल्ह्यातील सूरज जाधव या तरुणाने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. वर्षभरात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, कनेक्शन तोडली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दुसरा अर्थसंकल्प आला, तरीही काहीच होत नाही, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.