- यदु जोशी
मुंबई : जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली आहे. तसेच उपसा वाढला तरी अनेक गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ झाली, असा अहवाल महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने दिला आहे.
या योजनेवर महालेखाकार यांच्या अहवालातील आक्षेपांवर जलसंधारण विभागाने उत्तर दिले आहे. नागपूर, बुलडाणा, पालघर, अहमदनगर, सोलापूर, बीड या सहा जिल्ह्यांमधील जलयुक्त शिवार योजनेच्या १ लाख ७६ हजार २८४ कामांपैकी ५८ हजार ७३८ कामांचे मूल्यमापन करून हा अहवाल देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी दिलेल्या अहवालाचा यासाठी आधार घेतला आहे.
आक्षेप लावला फेटाळून-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून या अभियानाकडे पाहिले गेले; पण आघाडी सरकारच्या कारकीर्दीत यावर विविध आरोप झाले. परंतु हे अभियान योग्य पद्धतीने तयार केले नसल्याचा व त्याची तांत्रिक माहिती उपलब्ध नसल्याचा आक्षेप जलसंधारण विभागाने फेटाळला. भूजल पातळी वाढविण्यात ही योजना अपयशी ठरली नसल्याचा निष्कर्षही विभागाने काढला. विधिमंडळ समितीला दिलेल्या दस्तावेजात याची माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले.- गाव आराखडा तयार करताना तांत्रिक माहिती व शिवार फेरी घेऊन योग्य कामांची निवड करण्यात आली. २०१७-१८ पासून निवडलेल्या गावांचे महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (एमआरएसएसी) या संस्थेकडील तंत्रज्ञानाच्या आधारे नकाशे तयार केले. हे नकाशे एमआरएसएसी, नागपूर तसेच भूजल सर्वेक्षण विकास संस्था, पुणे कार्यालयाच्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित केले. २०१५-१६ आणि २०१६-१७ मधील त्रुटी २०१७-१८ पासून दूर करण्यात आलेल्या आहेत, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
जलसंधारण विभाग म्हणतो...जलयुक्त शिवार अंतर्गत केलेल्या कामांमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण झाली. दोन्ही हंगामांमध्ये पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली. कामे झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी नगदी पिके घेतलेली असून, त्या ठिकाणच्या शेतपिकांचे उत्पादन वाढलेले आहे.रब्बी पिकांमध्ये पालघर जिल्ह्यात २० टक्के, सोलापूर जिल्ह्यात ११ टक्के, अहमदनगर जिल्ह्यात ११ टक्के, बीड जिल्ह्यात १२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ८७ टक्के, तर नागपूर जिल्ह्यात ११ टक्के इतकी वाढ झाली.
अभियानांतर्गत साठवणूक झालेल्या पाण्याचा शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे. त्यामुळे पाण्याचा साठा झाला नाही, असे म्हणणे उचित ठरणार नाही.अभियानांतर्गत कामे सुरू असताना त्याचे फोटो जिओ टॅगिंगसह अपलोड करण्यात आले होते. त्यामुळे कामांची गुणवत्ता राखली गेली असून, पारदर्शक अंमलबजावणी झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानामधून केलेल्या कामांद्वारे साठवण क्षमता निर्माण होते. हे अभियान राबविलेल्या गावांमध्ये सरासरी पाऊस कमी पडला असला तरी टँकर उशिराने सुरू झाले. तसेच टँकर सुरू करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींचा आग्रह असतो.अभियानातील कामांचे त्रयस्थ संस्थेकडून मूल्यमापन करण्यात आले. त्रयस्थ संस्थेने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता संबंधित कंत्राटदाराकडून करून घेण्यात आली आहे.