मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना झालेली अटक या घटनाक्रमावरून राज्य सरकार कोंडीत सापडल्याचे चित्र असतानाच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी झाली. त्यात सरकारच्या डॅमेज कंट्रोलबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीला स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, अनिल परब आदी उपस्थित होते.
एनआयएच्या तपासात बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे सरकारभोवती संशयाचे धुके अधिकच गडद होत आहे. याबद्दल समन्वय समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच, माध्यमातून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याबाबतच्या रणनीतीवर विचार झाला, अशी माहिती आहे.
संपूर्ण तपास झाल्यानंतर आणि निष्कर्षाप्रत ल्यानंतरच एनआयएने त्यासंदर्भात बोलावे. प्रकरणाचा संपूर्ण छडा लागल्यानंतर अधिकृतपणे माध्यमांसमोर यावे, असे मत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
भाजपचा हल्लाबोल- प्रदेश भाजपने दिवसभर ट्विटवर ट्विट करीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला. हिंगणघाटमध्ये तरुणीला जिवंत जाळले, त्याचे काय झाले? पालघरमधील साधूंचे मारकरी मोकाट फिरत आहेत, संजय राठोड यांच्यावर अद्याप कारवाई नाही, तुम्ही नेमके काय केले, असे सवाल भाजपने केले आहेत.