अहमदनगर : भाजपा-सेनेमध्ये कुणाचाच पायपोस कुणात राहिलेला नाही़ करवाढीवरून शिवसेनेने त्यांच्याच मित्रपक्षाला पाकीटमार म्हटले आहे, मात्र राज्याचा कारभार सध्या या पाकीटमारांच्या हाती असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.दोन्ही पक्षांतील कुणी टक्केवारीचा तर कुणी खिसेकापूचा आरोप करीत आहेत. सेना नेत्यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन टॅब दाखविला़ राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना ही मंडळी पंतप्रधानांना टॅब दाखवित फिरत आहेत. सेनेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोदींची भेट घ्यायला हवी होती, असे विखे म्हणाले़ राज्यात वीज पडून पाच दिवसांत ४०-४२ जणांचा मृत्यू झाला़ आघाडी सरकारच्या काळात वीजरोधक यंत्र बसविण्याची योजना आखली होती, त्यासाठी २० लाख रुपयांची तरतूदही केली. मात्र सध्याच्या सरकारने या योजनेचे काय केले, ते माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़ शीना बोरा प्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह बड्या नेत्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
पाकीटमारांच्या हाती राज्याचा कारभार
By admin | Published: October 06, 2015 2:12 AM