नाशिक : कांद्याच्या वाढत्या भावाने ग्राहकाच्या डोळ्यांत पाणी आलेले असताना शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. या प्रश्नी सरकारचा बेजबाबदारपणा उघड झाल्याचे दिसते, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. कांद्याचे भाव वाढण्यास व्यापाऱ्यांची साठेबाजी कारणीभूत असून, त्यांच्याविरुद्ध राज्य शासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त एका आखाड्याच्या ध्वजारोहणप्रसंगी नाशकात आले असता विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, केवळ कांदाप्रश्नीच नव्हेतर, राज्यातील दुष्काळप्रश्नीदेखील राज्य सरकारची निष्क्रियता सिद्ध झाली असून, कोणताही मंत्री दुष्काळी दौरा करताना दिसत नाही.राज्यात फक्त ३५ टक्के पाऊस झाला असून, यापुढे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही बाबतीत अडवणूक करू नये. कांद्याची साठेबाजी करणाऱ्या दलालावर त्वरित कारवाई करावी आणि ग्राहकांना योग्य भावात कांदा उपलब्ध व्हावा, असेही ते म्हणाले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शाहीस्नानासाठी पाणी सोडताना व्यापक हिताचा विचार करूनच पाण्याचे व्यवस्थापन करावे. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
सरकारचा बेजबाबदारपणा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2015 2:09 AM