महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Padma Vibhushan Shiv Shahir Babasaheb Purandare) यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत जागविणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे उत्तुंग प्रतिभेचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. त्यांचे भावविश्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावले होते. त्यांच्या प्रत्येक श्वासात महाराजांचा ध्यास होता. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या लिखाणातून, व्याख्यानांमधून तसेच 'जाणता राजा' सारख्या महानाट्यामधून त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे पुण्यकार्य केले.
अलीकडेच शिवसृष्टी येथे भेट दिली असताना व त्यानंतर एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते राजभवन येथे आले असताना त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे भाग्य लाभले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने भारतवर्षाच्या आसमंतातील एक तेजस्वी शिवतारा निखळला आहे. त्यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी साकारणे व शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वदूर पोहोचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
महाराष्ट्रात येऊन शिवशाहिर बाबासाहेब यांचा घनिष्ट परिचय होणे व त्यांचा स्नेह आपणांस मिळणे ही आपली जीवनातली एक मोठी उपलब्धी आहे असे आपण मानतो. त्यामुळे त्यांचे निधन हे आपल्याकरिता वैयक्तिक स्तरावर देखील दुःखदायक आहे. या दुःखद प्रसंगी आपल्या तीव्र शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.