मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (corona virus) वाढती संख्या, कोरोना लसींचा तुटवडा, प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी यांवरून महाविकास सरकारवर विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षांनीही टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे राज्यात लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे सांगितले जात असून, याबाबत कधीही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. (governor bhagat singh koshyari letter to cm uddhav thackeray over gudhi padwa)
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच अनेकदा पाहायला मिळाले आहे. तसेच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खटके उडून आरोप-प्रत्यारोप झालेले जनतेने पाहिले आहे. राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीवरुन दीर्घकाळ रंगलेला वाद, राज्य सरकारने विमानातून प्रवास करण्यास नाकारलेली परवानगी अशा अनेक कारणांमुळे राज्यपाल आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र, भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्र लिहिले आहे.
“फेसबुक लाइव्हवर मोठ्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी काही बोलतील का?”
राज्यपालांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्षाभिनंदन. हे हिंदू नवे वर्ष आपणाकरिता तसेच कुटुंबातील सर्वांकरिता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असे कोश्यारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांशी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. कोरोना नियंत्रण किंवा उपाययोजनांसाठी प्रशासकीय यंत्रणा कमी पडल्याचा ठपकाही केंद्रीय पथकाने ठेवला आहे. दुसरीकडे राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने सध्या राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. अशावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संवाद पुन्हा सुरु होणे, ही सकारात्मक बाब ठरु शकते, असे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.