पुणे - सध्या दोन जण मत व्यक्त करतात. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे भगतसिंग कोश्यारी, फडणवीस हे स्वत:साठी मत व्यक्त करतात. पक्षासाठी मत व्यक्त करण्याची भूमिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी निभावतात. राज्यपालांची उचलबांगडी कशासाठी? राज्यपालांनी मराठी माणसाला इशारा दिला. इकडचा व्यापार एकतर गुजरातींकडे आहे नाहीतर मारवाड्यांकडे. राज्यपालांचा टोला काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठी नेत्यांना आहे असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इतके वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीनं राज्यात सत्ता केली. परंतु मराठी माणसाच्या हातात आर्थिक व्यवहार देऊ शकला नाही. राज्यपालांनी मराठी माणसाचे डोळे उघडे केले. त्यामुळे मराठी माणसांनी या बुजगावण्यांसोबत राहायचं की नवीन नेतृत्वामागे उभं राहायचं. राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा बिल्कुल अपमान झाला नाही. त्यांनी सत्यपरिस्थिती मांडली. इथल्या राज्यकर्त्यांनी मराठी माणसांच्या हाती आर्थिक व्यवहार दिले नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
तसेच राज्यपालांनी केलेल्या विधानाचं मी समर्थन करतो. जो मराठी माणूस आहे त्याने लक्षात घ्यावं काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना यांची प्रतिमा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उघड केली आहे. इतकी वर्ष राज्य सांभाळूनही मराठी माणसांच्या हाती आर्थिक व्यवहार दिले नाही अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
राज्यपालांचा खुलासा मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला,” असं राज्यपाल म्हणाले. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नसल्याचं खुलासा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला आहे.