मुंबई : राज्यात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी ८ हजारांची मदत जाहीर केली आहे. तर दोन हेक्टरपर्यंतच्या फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी १८ हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. मात्र राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत कमी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.
राज्यपालांनी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली खरीप पिकांसाठी हेक्टरी ८ हजार रुपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. तर हेक्टरी ८ हजार रुपये मदत म्हणजे प्रती गुंठा ८० रुपये इतकी मदत खूप कमी असल्याचे पाटील म्हणाले.
तसेच राज्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जाहीर केलेली मदत नुकसानीच्या मनाने अत्यंत कमी आहे. राज्यपाल यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून प्रति हेक्टरी खरीप पिकांसाठी कमीत-कमी २५ हजार रुपये तर फळबागांसाठी ५० हजार रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी सुद्धा यावेळी जयंत पाटील यांनी केली.