पुणे - गुंतवणुकीवर जादा व्याज आणि आकर्षक योजनांचे आमिष दाखवून राज्यभरातील हजारो गुंतवणुकदारांना कोट्यावधींचा गंडा घालणाºया आधुनिक गृहनिर्माण वित्तीय कापोर्रेशनच्या प्रकाश गोवळकर (रा़ नंदनवन कॉलनी, नागपूर) याला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने वर्धा येथे जेरबंद केले.
आधुनिक गृहनिर्माण वित्तीय कॉपोर्रेशन कंपनीने २००३ ते २००५ या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, पुणे ग्रामीण आणि सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शाखा सुरु केल्या होत्या. प्रचलित कालावधीपेक्षा कमी कालावधीत आणि जादा व्याजदराचे आमिष गुंतवणुकदारांना दाखविण्यात आले होते. राज्यभरातील ४१ हजार २९६ गुंतवणुकदारांनी ११ कोटी १७ लाख ११ हजार ८९१ रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती. मात्र, त्यानंतर कंपनीने गाशा गुंडाळला होता. या प्रकरणी राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये २३ गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता़ या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे़ मात्र, कंपनीचा संचालक असलेला प्रकाश गोवळकर काही हाती लागत नव्हता़ अटक टाळण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. वारंवार शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्यामुळे अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयाने ७ नोव्हेंबर २०१३ रोजी फरारी घोषित केले होते. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यासाठी शोधमोहिम हाती घेतली होती.
गोवळकर हा नागपूरमध्येच असल्याची माहिती विभागाच्या भरारी पथकाचे अप्पर पोलीस अधिक्षक सतीश गोवेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बी. आर. पुल्ली, वाय. जी. निकम, हवालदार देसाई, दोरगे, जोशी, भापकर यांनी त्याच्याबाबत माहिती मिळविण्यास सुरुवात केली. २२ जानेवारीपासून या अधिकारी-कर्मचाºयांनी वर्धा येथे तळ ठोकला होता.
प्रकाश गोवळकर हा हिंगणघाट येथे मोरा बागेच्या मागील बाजूस आला असल्याची माहिती या अधिकाºयांना मिळाली. त्यांनी त्वरित तेथे जाऊन त्याला अटक केली. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत या प्रकरणातील ५ आरोपींना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.