कोल्हापूर : सोंगाडय़ा, मर्दानी, बन्या बापू अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक व ज्येष्ठ निर्माते गोविंद कुलकर्णी (84 वय) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी विजया, मुले डॉ. चारूहास भागवत, उमेश भागवत, मुलगी असा परिवार आहे.
वृद्धत्वामुळे गेले काही दिवस कुलकर्णी आजारी होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दुपारी तीन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोविंद कुलकर्णी हे मूळचे पैठणचे. त्यांचे खरे नाव शरद्चंद्र भागवत. चित्रपटांचे प्रचंड आकर्षण असल्याने त्यांनी घर सोडून कोल्हापुरात पाऊल ठेवले. गोविंद कुलकर्णी या नावाने त्यांनी चित्रपट कारकिर्द सुरू केली. ‘मुरळी मल्हारीरायाची’ या चित्रपटाचे 1969 साली दिग्दर्शन करून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. अशी रंगली रात्र, चुडा तुझा सावित्रीचा, एकटा जीव सदाशिव, ह:या-ना:या ङिांदाबाद, लागेबांधे, गोविंदा आला रे आला, जय तुळजाभवानी, मानाचं कुंकू, बन्याबापू, अंगार, शपथ तुला बाळाची, मर्दानी, दैवत हे त्यांचे गाजलेले चित्रपट. ‘असंच पाहिजे नवं नवं’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होय. (प्रतिनिधी)