स्वप्नील जोशी/आॅनलाइन लोकमत नाशिक, दि. 7 - विविध उत्सवांमध्ये नाशिकचा ढोल सर्वत्र वाजविला जातो, त्याच धर्तीवर खास महालक्ष्मींसाठी लागणाऱ्या विड्यालादेखील नाशकातून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. नाशिकमध्ये ढोल बरोबरच आता नाशिकच्या गोविंद विड्याने आपला दबदबा निर्माण केला आहे.महालक्ष्मींचे घरोघरी आगमन होणार असून याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रसिद्ध ‘गोविंद विड्या’ला मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. महालक्ष्मीसाठी लागणाऱ्या नैवेद्यात समावेश असलेल्या विड्याने आता पारंपरिक तेचा साज सोडत आधुनिकतेचा साज पांघरला आहे. आयुर्वेदिक आणि आकर्षक पद्धतीने सजविलेला विडा सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.पाच विड्यांच्या पानाच्या साहाय्याने महालक्ष्मीच्या आकाराचा विडा रवींद्र लहामगे यांनी साकारला आहे. नाशिकसह अहमदनगर, महाबळेश्वर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, येवला, नांदगाव अशा राज्यभरातील विविध ठिकाणांहून या विड्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. गोविंद विडा बनविण्यासाठी गेल्या महिनाभरापासून तयारी करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीलादेखील हा विडा पाठविण्याचा मान लहामगे यांना मिळाला आहे.गोविंद विड्याची सजावट करण्यासाठी तब्बल ५२ प्रकारचे घटक यात वापरण्यात येतात, यामध्ये काथ आणि चुना यांच्या विशिष्ट मिश्रणासह गुलाबपाणी आणि लोणी यांचे मिश्रण, सुपारी, बडीशेप, सुकामेवा, गुलाब पाकळ्या, गुलकंद, मध, केशर, अस्मनतारा, वेलची, लवंग, ओवा, ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, तीळ, खोबरे, जायपत्री, खडीसाखर, काळ्या मनुका, कापूर, सुवर्णभस्म, चांदीचा वर्ख अशा ५२ घटकांचा यात समावेश आहे. या विड्याची विशिष्ट पद्धतीने बांधणी करून त्याची आकर्षक सजावट हेच गोविंद विड्याचे वैशिष्ट्य आहे. या गोविंद विड्याला गौराईचे आकर्षक रूप प्राप्त व्हावे यासाठी हार, नथ, मुकुट आणि इवल्याशा छत्रीचा अत्यंत खुबीने वापर केला जातो. या विड्यासाठी चेरीपासून मुखवटा तर लवंगीपासून डोळे साकारण्यात येतात. विड्याभोवती वापरण्यात येणारे वस्त्र खास मथुरेहून मागविले जातात.हा विडा बनविण्यासाठी खास ओडिसा येथून नागवेलीची पाने मागविली जातात. लहामगे हे नाशिक शहरात मघई पान बनविण्यासाठी प्रसिद्ध असून गेल्या पंधरा वर्षांपासून ते भाविकांसाठी गोविंद विडा साकारत आहेत. आपल्या दुकानाची सात्त्विकता टिकून रहावी तसेच तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी लहामगे आपल्या दुकानात सिगारेट, तंबाखू, गुटखा यासारख्या पदार्थांची विक्री करत नाही हे या पान विक्री दुकानाचे वेगळेपण म्हणायला हवे.
VIDEO- गौराईच्या स्वागताला नाशिकच्या ‘गोविंद विड्या’चा साज
By admin | Published: September 07, 2016 7:03 PM