- स्नेहा पावसकर, ठाणे
दहीहंडीच्या थरांवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शड्डू ठोकल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही नऊ थरांची दहीहंडी लावणार आणि जे गोविंदा पथक ही हंडी फोडेल त्यांना ११ लाखांचे बक्षीस देणार, असा निर्णय ठाण्यातील मनसेच्या नेत्यांनी जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी गोविंदांचे वय आणि दहीहंडी फोडण्याकरिता लावण्यात येणारे थर यावर निर्बंध घालणारा निर्णय दिल्यानंतर गोविंदा पथक तसेच आयोजकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूंच्या सणांवरच न्यायालयाचे निर्बंध कशाला, अशा शब्दांत संताप व्यक्त केल्यानंतर लगेचच सायंकाळीच ठाण्यातील मनसे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी भगवती मैदान येथे नऊ थरांची दहीहंडी उभारली जाईल, असे जाहीर करत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. डीजेच्या धांगडधिंग्याविना पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात मनसेच्या वतीने हा दहीहंडी उत्सव साजरा होईल. नऊ थर लावणाऱ्या पथकाला ११ लाखांचे बक्षीस देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार असल्याचे राज ठाकरे यांना सांगितले आहे. त्यानुसार या निर्णयात काही बदल झाले तर ठीक; नाहीतर, आम्ही नऊ थरांची हंडी लावणारच! एरवीही मनसेच्या कार्यकर्त्यांवर विविध आंदोलनांसाठी खटले दाखल होतातच, असेही जाधव म्हणाले.न्यायालयाच्या निर्णयानंतर गोविंदा पथकांमध्ये नाराजी होती. मात्र राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर यंदाही दहीहंडी उत्सव उत्साहात, जल्लोषात आणि चांगल्या पद्धतीने होईल, अशी आशा पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. ठाण्यातील गोविंदा पथकांनी जितक्या थरांचा चांगला सराव झाला आहे, तितके थर जरूर लावावेत. मात्र उगाच साहस करू नये. - समीर पेंढारे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा दहीहंडी समन्वय समितीआम्ही नऊ थरांची हंडी लावणारच. न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवल्याबाबतही गुन्हे दाखल करावे. गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, आम्ही उंच दहीहंडी लावणारच. - अविनाश जाधव, मनसे अध्यक्ष, ठाणे