ठाणे : बिगारी काम करणाऱ्या कुटुंबातील गोविंदा राठोड याने अत्यंत कष्टाने दहावीच्या परीक्षेत ८३.२० टक्के गुण मिळवल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शिवसेनेने त्याला आर्थिक मदतीचा हात दिला.‘दारिद्रयाचा अंधार भेदून त्याने गाठला यशाचा सोपान’ या मथळ््याखाली प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या गोविंदा राठोडच्या यशाची कहाणी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केली होती. गोविंदाचे आई वडिल बिगारीचे काम करतात. घरी अठराविश्वे दारिद्रय असताना केवळ शिक्षणाची आवड आणि शिकण्याची जिद्द या दोन गुणांवर त्याने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्याच्या घरातील बिकट परिस्थिती आणि त्याचा मुकाबला करताना त्याने मिळवलेले यश याची कहाणी वाचून शिवसेनेचे उपशहरप्रमुख जगदीश थोरात यांनी त्याला तत्काळ पाच हजार रुपयांची मदत केली. ‘लोकमत’मुळे गोविंदाची कहाणी समजल्याचे थोरात यांनी सांगितले. गोविंदासारख्या अनेक गरीब आणि गरजूंना त्यांनी मदत करण्याची तयारी दाखविली आहे. यावेळी गोविंदाच्या शाळेचे मुख्याधापक आनंद सूर्यवंशी, त्याचे वडिल आणि शिक्षक त्याचबरोबर नौपाडा उपविभागप्रमुख बाळा गवस, वृक्षप्राधिकरण सदस्य राजेश तावडे, विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद बनसोडे, शाखाप्रमुख मुकुंद ठाकूर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गोविंदा राठोडला मिळाले सेनेकडून अर्थसाहाय्य
By admin | Published: June 13, 2016 5:11 AM