अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरुवारी गोपाळकाल्याच्या दिवशी २ हजार ३७० सार्वजनिक तर ५ हजार ८०१ खाजगी अशा एकूण ८ हजार १७१ दहीहंड्या जिल्हाभरात बांधण्यात आल्या होत्या. त्यापैकी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ८० टक्के दहीहंड्या विविध गोविंदा पथकांनी फोडल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस सूत्रांनी दिली आहे. सर्वाधिक २६० सार्वजनिक दहीहंड्या तळा येथे तर सर्वाधिक ९०० खाजगी दहीहंड्या दिघीमध्ये होत्या. जिल्ह्यात ५४ गोविंदा पथकांच्या मिरवणुका होत्या. सर्वत्र गोपाळकाल्याचा सण उत्साहात व शांततेत झाला. कोठेही अनुचित प्रकाराची नोंद झाली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. सर्वाधिक आठ मिरवणुका गोरेगाव येथे निघाल्या.अलिबाग कोळी समाजाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ग्रीस लावलेल्या निसटत्या मलखांबाच्या’ हंडीचे यंदाचे ५१ वे वर्ष होते. यंदा ही हंडी फोडण्याचा मान जयेश गडखल या १९ वर्षीय युवकाने पटकावला. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते जयेशला ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. मच्छीमारी बोटींना लावण्यात येणारे ग्रीस मलखांबाला लावून त्याच्या वर दहीहंडी बांधण्यात येते. गोविंदा मलखांबावरुन चढत वर हंडीकडे जावू लागला की ग्रीसमुळे निसरड्या असणाऱ्या मलखांबावरुन तो खाली घसरुन येतो. एकापाठोपाठ एक गोविंदा अशाच प्रकारे मलखांबावर मोठ्या कौशल्याने चढून दहीहंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. यंदा एकूण ५२ गोविंदा स्पर्धक ही हंडी फोडण्याकरिता सहभागी झाले होते. ५२ गोविंदांच्या तब्बल साडेचार तासांच्या अथक प्रयत्नांती जयेश यास संध्याकाळी ६.१५ वाजता ही दहीहंडी गाठून ती फोडण्यात यश आले. या अनोख्या दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. (अधिक छायाचित्रे/२)>रोहा : रोह्यात पारंपरिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा पाऊस चांगला झाला असला तरी आज मात्र पावसाने पाठ फिरविल्याने आधीच वाढलेला उष्मा आणि त्यातच कडक उन्हातही गोविंदा पथकांनी दहीहंड्या फोडल्या.रोहा तालुक्यात जवळपास ११५ दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागासह रोहा अष्टमी शहरातील विविध आळ्यांमधून गोविंदोत्सव साजरा केला जातो. दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान शहरातील प्रथेपरंपरेप्रमाणे गोविंदा पथकांनी दहीहंड्या फोडून या उत्सवाचा आनंद लुटला. रोहा : गौरोबा नगर दमखाडी येथील गोविंदा पथक आणि महात्मा फुले नगर येथील संत रोहिदास गोविंदा पथकाने मुख्य हमरस्त्यावरील तीन बत्ती नाका पोलीस चौकीपर्यंत येऊन दहीहंड्या फोडल्या. आमदार अवधूत तटकरे मित्र मंडळाची लाखमोलाची दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
गोविंदा...रे...गोपाळाच्या ठेक्यावर फोडल्या हंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 2:16 AM