Govinda Shiv Sena Shinde Group News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील इन्कमिंग वाढल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता गोविंद शिंदे गटाकडून प्रचार मैदानात उतरले आहेत. पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा स्टार प्रचारक असतील, असे म्हटले होते. आता शिवसेना शिंदे गटाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गोविंदा यांनी थेट नागपूर गाठले.
रामटेकमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा नागपुरात दाखल झाले. वायव्य मुंबईतून ठाकरे गटाने अमोर कीर्तिकर यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांना टक्कर देण्यासाठी गोविंदा यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. यासंदर्भात गोविंदा यांना मीडियाने प्रश्न विचारला.
शिवसेनेच्या उमेदवारांना चांगले यश मिळेल
शिवसेनेच्या उमेदवारांना चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. माझा रेकॉर्ड चांगला असून मी जिथे जातो तिथे विजय मिळतो, असे गोविंदा यांनी सांगितले. तसेच निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना गोविंदा यांनी सांगितले की, तिकीट मागितले नाही आणि निवडणूक लढवण्याबाबत काहीही चर्चा केली नाही. माझ्यासाठी ही नव्याने सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. शिवसेनेच्या प्रचाराची दखल घेतली जाईल, असे गोविंदा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जवळपास १४ वर्षानंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गोविंदाने प्रवेश केला. २००४ मध्ये मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून गोविंदाला उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता.