अंबरनाथ : जांभिवलीपाडा परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जीआयपी टँक येथे विजेचा धक्का बसून मृत्यूू झाला. या टँकवरील मोटारीचा वापर रेल नीर प्रकल्पावर पाणी नेण्यासाठी करण्यात येतो.जीआयपी टँक हा रेल्वे विभागाचा असून या टँकमधील पाण्याचा वापर करून रेल नीर हा मिनरल वॉटरचा प्रकल्प चालवण्यात येतो. या प्रकल्पावर पाणी नेण्यासाठी धरणात मोटार बसवली आहे. या मोटारीला वीजपुरवठा करणारी वीजवाहिनी टाकली आहे. त्यात दोष होता. त्यामुळे जांभिवलीपाड्यातील दिनेश जनार्दन पाटील (२६) हा तरुण दहीहंडी फोडल्यावर पाय धुण्यासाठी धरणाच्या ठिकाणी गेला. या वेळी त्याचा पाय वाहिनीला लागला. त्यात त्याला मोठा धक्का बसला. त्यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. दिनेश पाटील यांचे काका आणि बांधकाम सभापती सदाशिव पाटील यांनी रेल्वेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. धरणपात्र हे गावाला लागून असल्याने त्याचा धोका कायम ग्रामस्थांना आहे. (प्रतिनिधी)
शॉक बसून गोविंदाचा मृत्यू
By admin | Published: August 27, 2016 4:11 AM