श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी काशी आणि मथुरेबाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. अयोध्येनंतर काशी आणि मथुरा ही धार्मिक स्थळे शांततेत विलीन झाल्यानंतर आम्ही अन्य गोष्टी विसरून जाऊ, असं गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केलं आहे.
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, मी आधीच सांगितले आहे की, तीन मंदिरे शांततेत मिळाल्यानंतर इतर मंदिरांकडे लक्ष देण्याची आमची इच्छाही नाही, कारण आम्हाला भविष्यात जगायचे आहे. भूतकाळात जगायचे नाहीय. त्यामुळे देशाचे भवितव्य चांगले व्हाव. त्यामुळे मी आधीच सांगितलेलं, ही तिन्ही मंदिरे (अयोध्या, काशी, मथुरा) समजूतदारपणाने आणि प्रेमाने मिळाली तर बाकीच्या सर्व गोष्टी आम्ही विसरून जाऊ, असं गोविंददेव गिरी महाराज यांनी सांगितले.
आणखी एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, मी त्या लोकांनाही प्रेमाने समजावून सांगेन. बघा, या सगळ्या ठिकाणांसाठी एक गोष्ट सांगता येणार नाही. काही ठिकाणी समजूतदार लोक आहेत, तर काही ठिकाणी समजूतदार लोक नाहीत. जिथे परिस्थिती असेल तिथे त्याच पद्धतीने लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन गोविंददेव गिरी महाराज यांनी म्हटलं आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान अनेक धार्मिक स्थळांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच क्रमाने ते पुण्यातील आळंदीत पोहोचले, तिथे त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि श्री श्री रविशंकर आणि इतरही सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर ५०० वर्षांनंतर राम मंदिराची निर्मिती झाली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंदिराच्या गर्भगृहात रामललाचा प्राणप्रतिष्ठा करण्यात आला होता, परंतु सध्या मंदिराचे बांधकाम सुरू असून आगामी काही महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. याशिवाय ज्ञानवापी आणि मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.