मुंबई-
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवरुन धारेवर धरलं जात आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. यातच आज राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा जुना अंदाज आज विधानसभेत पुन्हा पाहायला मिळाला. आपल्या खुमासदार शैलीनं भुजबळ यांनी विधानसभेचा आजचा दिवस गाजवला. शेलक्या शब्दात भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी काळी दाढी आणि पांढरी दाढी याचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही मिश्किल टिप्पणी केली.
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा मला मनापासून आनंद आहे. पण मला आनंद वेगळ्याच गोष्टीमुळे झाला आहे. काळी दाढी असणारे ते राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात सध्या माझ्यासारख्या पांढऱ्या दाढीचा प्रभाव आहे. देशात पांढरी दाढी आणि राज्यात काळी दाढी प्रभावशाली ठरते आहे. पण जीएसटीवरुन लोकांच्या भावना काय आहेत त्याही केंद्रात तुम्ही सांगा. तुम्हाला केंद्रात खूप वजन आहे", असं छगन भुजबळ म्हणाले.
जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीवरुन केली टीकाछगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडून जीवनावश्यक वस्तूंवर लावण्यात आलेल्या जीएसटीच्या मुद्द्यावरुन टीका केली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीचा उल्लेख बिलात नाही, पण तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात आणि तुम्हाला बोलायचं असेल तर बोलू शकता, असं भुजबळांच्या निदर्शनास आणून दिलं. "भारतात मंदी नाही असं तुम्ही म्हणता मग जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याची वेळ का येते? कोणत्याही वस्तूवर जेव्हा तुम्ही जीएसटी लावला की त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो. आता हे बिलात नाही असं तुम्ही म्हणत असाल पण केंद्रातलं तुमचं वजन आता वाढलंय असं मी आजच वृत्तपत्रात वाचलं म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या भावना केंद्रात सांगा. तुमचा दरारा आता दिल्लीत वाढला आहे. मुख्यमंत्र्यांनाही सोबत घेऊन जा आणि केंद्राला समजावून सांगा जीएसटीचा फार वाईट परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांवर होतो. देशाचं लक्षं तुमच्या दोघांकडे लागलं आहे", असं छगन भुजबळ म्हणाले.
फक्त भाषणावर जीएसटी नाही- भुजबळ"शाळेचे विद्यार्थी वापरत असलेल्या पेन्सिल, रबरवरही जीएसटी लावला. रुग्णालयाच्या ५ हजरांच्यावरील बिलावरही तुम्ही जीएसटी लावला. हे काय चाललं आहे? आता देशात फक्त भाषणावर जीएसटी लावलेला नाही. नाहीतर तुमचं भाषण एक मिनिट झालं आता एवढा जीएसटी भरा असंही सांगितलं जाईल", असा टोला छगन भुजबळ यांनी सरकारला लगावला.