शशिकांत ठाकूर। लोकमत न्यूज नेटवर्ककासा: डहाणू तालुक्यातील आदिवासी भागातील ग्रामपंचायती ४० वर्षापासून विभाजनाच्या प्रतिक्षेत असून तीन ते चार गावांसाठी एकच ग्रामपंचायत असल्याने गावपाडयांचा विकासच होत नाही. विकासकामांवर मर्यादा येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते.तालुक्यात एकूण ८५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी आदिवासी भागातील बहूतेक ग्रामपंचायती या गृप ग्रामपंचायती आहेत. कासा ग्रामपंचायतीमध्ये कासा, भिसेनगर, घोळ, भराड या चार गावांचा समावेश होतो. तिची लोकसंख्या १० हजारापर्यंत आहे. तवा ग्रामपंचायतीत तवा, धामटणे, कोल्हाण, पेठ ही चार गावे आहेत. उर्से ग्रामपंचायतीत उर्से, साये, आंबिस्ते म्हसाड या चार गावांचा समावेश होतो. सारणी ग्रामपंचायतीत सारणी, आंबिवली, निकावली ही तीन गावे आहेत.मुरबाड ग्रामपंचायतीत मुरबाड, वांगर्जे, पिंपळशेत गावे आहेत. महालक्ष्मी ग्रामपंचायतीत महालक्ष्मी, आंवढाणी, सोनाळे, खाणीव ही चार गावे समाविष्ट आहेत. ओसरविरा ग्रामपंचायतीत ओसरविरा, दहयाळे व कांदरवाडी ही तीन गावे आहेत. वेती ग्रामपंचायतीत वेती, वरोती, सुर्यानगर अशा तीन गावे मिळुन आहे. तर सदर गावांची लोकसंख्या तीन ते चार हजारापार्यंत आहे. दरम्यान याबाबत ग्रामसभेत विभाजनाचा प्रस्ताव घेऊन वेळोवेळी संबंधित कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र त्यांची दखल घेत नसल्याचे प्रदिप पाटील यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीची निर्मिती ४० वर्षापूर्वी झाली. परंतु त्यानंतर लोकसंख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. तर ग्राम पंचायतीत समाविष्टगावे ही परस्परांपासून दूरवर आहेत. तर कार्यालय एक गावात असल्याने नागरिकांची मोठी अडचण होते.
४० वर्षांपासून ग्रा.पं. विभाजन नाही
By admin | Published: May 14, 2017 2:22 AM