मुंबई : आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांनी भूगर्भातील हालचाली टिपणारे ‘ग्राऊंड पेनिटे्रटिंग रडार’ (जीपीआर) साकारले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू असलेल्या ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनात हे यंत्र मांडण्यात आले आहे.‘मेक इन इंडिया’ सप्ताहामधील प्रदर्शन पाहण्यासाठी उद्योगपतींसह सर्वसामान्यांच्या रांगा लागत असून, वस्त्रोद्योग आणि तंत्रज्ञानाविषयक प्रदर्शनाकडे प्रेक्षकांचा सर्वाधिक ओढा आहे. तंत्रज्ञानाविषयक प्रदर्शनात ‘जीपीआर’ यंत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. आयआयटीचे विद्यार्थी तसनीम हे येथे दाखल होणाऱ्या प्रेक्षकांना यंत्राविषयी सविस्तर माहिती सांगत आहेत.जीपीआर यंत्र साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये खर्च आला आहे. हे यंत्र भूगर्भातील एक मीटरपर्यंतच्या हालचाली टिपत आहे. भूगर्भातील धातूंसह खनिजे व अन्य घटक टिपण्यासाठी यंत्राची मदत घेतली जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लष्करानेही आयआयटी रुरकीने साकारलेल्या जीपीआरची तपासणी केली आहे आणि आपल्या वापरात हे यंत्र दाखल केले आहे. देशाच्या सीमेच्या अलीकडे शत्रूंकडून भूगर्भात केल्या जाणाऱ्या हालीचालींवरही लष्कराला जीपीआर यंत्राद्वारे लक्ष ठेवता येत असल्याचा दावा आयआयटी रुरकीने केला आहे.आयआयटी रुरकीने साकारलेले हे यंत्र सध्या प्राथमिक स्वरुपात असले तरी यात आणखी संशोधन करण्यात येणार असल्याचे तसनीम यांनी सांगितले. मुंबई तसेच अन्य महानगरांमध्ये विविध कामांसाठी वारंवार खोदकाम केले जाते. खोदाकामावेळी भूगर्भातील टेलिफोन वायर वा जलवाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी जीपीआरसारख्या यंत्राची मदत घेतली तर भूगर्भातील यंत्रणेची होणारी हानीही टाळता येईल, असेही तसनीम यांचे म्हणणे आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी छोटेखनी असे सौर दिवे साकारले आहेत. प्रदर्शनात मांडण्यात आलेले छोटे सौर दिवे पाहण्यासाठीही विद्यार्थ्यांची गर्दी उसळत असून, आयआयटीचे अन्य संशोधन प्रकल्पही विद्यार्थ्यांचा आकर्षण केंद्रबिंदू ठरत आहेत.
भूगर्भातील हालचाली टिपतेय ‘जीपीआर’!
By admin | Published: February 17, 2016 3:19 AM