मुंबई : नो पार्किंग किंवा अपघातग्रस्त वाहनांना उचलताना कोणतेही नुकसान पोहोचू नये तसेच त्याचे चित्रीकरण व्हावे यासाठी सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा असणारी आधुनिक क्रेन मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे. जवळपास अशा ८0 क्रेन असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. मुंबई शहर व उपनगरात पार्किंगचा विषय गंभीर होत चालला आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने नो पार्किंगमध्येही अनेक जण वाहने उभी करतात. नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यावर त्याविरोधात वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. प्रत्येक वर्षी जवळपास चार ते पाच लाख वाहनांवर कारवाई केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई होत असताना या कारवाईत सहभागी होण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे फक्त ७0 क्रेन आहेत. या क्रेन वाहतूक पोलिसांच्या स्वत:च्या मालकीच्याही नाहीत. कमी असणाऱ्या क्रेन पाहता आणखी ८0 नव्या क्रेन आपल्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या क्रेनवर जीपीएस आणि सीसीटीव्ही असतील. साधारपणे येत्या तीन महिन्यांत नव्या क्रेन दाखल होतील. जुन्या क्रेनमध्ये बीएमडब्लू आणि अन्य महत्त्वाच्या तसेच अवजड वाहने उचलण्याची क्षमता नव्हती. या क्रेनमध्ये मात्र तशी क्षमता असेल. महत्त्वाची बाब म्हणजे नो पार्किंगमधील वाहने उचलताना अनेकदा वाहनांना नुकसान पोहोचते. या नव्या क्रेनमुळे वाहनांना नुकसानही पोहोचणार नसल्याचा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
वाहने उचलणाऱ्या क्रेनला जीपीएस, सीसीटीव्ही
By admin | Published: June 28, 2016 5:29 AM