अविनाश साबापुरे यवतमाळ : कोरोना काळात राज्य आर्थिक संकटात असल्याची आवई उठविली जात असताना दुसरीकडे शिक्षणमंत्र्यांसाठी नवीन कार खरेदी करण्याचा जीआर एका झटक्यात निर्गमित करण्यात आला. तर दुसरीकडे विनाअनुदानित शिक्षकांसाठी तरतूद करूनही पगाराचा जीआर निर्गमित करण्यासाठी नियम दाखविले जात आहेत. यामुळे राज्यातील बिनपगारी शिक्षकांमध्ये संताप उसळला आहे. तर बीएडधारक बेरोजगारांनी सोशल मीडियातून याविरुद्ध आवाज उठविला आहे.
शालेय शिक्षण विभागाने ३ जुलै रोजी शिक्षण मंत्र्यांसाठी नवीन गाडी खरेदी करणे आणि त्यासाठी धनादेश संबंधित कंपनीला हस्तांतरित करण्याबाबतचा जीआर काढला आहे. हाच जीआर टिष्ट्वटरवर पोस्ट करून डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने आपला संताप नोंदविला आहे. ‘शिक्षणमंत्र्यांना २२ लाखांची गाडी घेण्यासाठी अर्थ मंत्रालयाची लगेच परवानगी मिळते. पण रखडलेल्या शिक्षक भरतीची फाईल दोन महिन्यांपासून अर्थ मंत्रालयात परवानगीसाठी धूळखात पडून राहते’ असे टिष्ट्वट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष संतोष मगर यांनी केले आहे. विशेष म्हणजे हे टिष्ट्वट मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण राज्यमंत्री यांना टॅग करण्यात आले आहे. टिष्ट्वट पोस्ट होताच राज्यातील संतप्त शिक्षकांनी, बेरोजगार उमेदवारांनी त्यावर भराभर निषेधाच्या प्रतिक्रियांचा भडिमार सुरू केला आहे.
तर दुसरीकडे, गेल्या २० वर्षांपासून विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये बिनपगारी काम करणाºया शिक्षकांसाठी गेल्या अधिवेशनात वेतन अनुदानाची तरतूद करण्यात आली. मात्र अद्यापही त्यासाठी जीआर निर्गमित न झाल्याने या शिक्षकांच्या हाती पगार पडलेला नाही. उलट शिक्षण संचालक, उपसंचालक स्तरावरून त्यासाठी वारंवार शाळांची माहिती मागविली जात आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यासाठी गाडी खरेदीचा जीआर दिसताच या शिक्षकांनी संताप नोंदविला आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन लागू झाल्याने सरकारचे उत्पन्न घटल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे विविध योजनांना कात्री लावून कर्मचाºयांचे पगारही कपात करण्याची भाषा सुरू आहे. मंत्र्यांच्या कामकाजासाठी वाहन आवश्यक असले तरी राज्य आर्थिक संकटात असताना हा खर्च टाळावा, अशी मागणी होत आहे.
बेरोजगार युवक शुक्रवारी जाळणार पदव्याशिक्षकांचे, बेरोजगार शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवून शिक्षण मंत्री लाखो रुपयांची गाडी खरेदी करीत आहे, या विरोधात शुक्रवारी १० जुलै रोजी डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. लॉकडाऊनच्या निकषांमुळे हे आंदोलन प्रत्येक बेरोजगार आपापल्या घरी आपल्या पदव्या जाळून त्याचे फोटो व्हायरल करणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिली. शिवाय याबाबत रविवारीच मुख्यमंत्र्यांना इमेलही पाठविण्यात आला.
पगार सहा हजार, घरभाडे आठ हजार!शिक्षण सेवकांचे मानधन वाढविण्याची मागणी शिक्षण विभागाने प्रलंबित ठेवली आहे. शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेल्या उमेदवारांना इतर शहरांमध्ये राहावे लागत आहे. पुणे महापालिकेच्या शाळेत शिक्षण सेवक असलेल्या वैभव पटांगडे यांना ६ हजार मासिक मानधन असून त्यांचे घरभाडे मात्र ८ हजार आहे. त्यामुळे जगावे कसे, हा प्रश्न पटांगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.