मुंबई : माध्यमिक शाळांतील वरिष्ठ वेतनश्रेणीतील शिक्षकांना ७०० रुपयांची ग्रेड पे वाढ देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे. वरिष्ठ वेतनश्रेणीत काम करणाऱ्या दोन लाख शिक्षकांचे तुटपुंज्या वाढीमुळे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप शिक्षक सेलने केला आहे.शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी सांगितले की, राज्यात सात लाख प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आहेत. सेवेच्या १२ वर्षांनंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होते. त्यानुसार प्राथमिकमधील वरिष्ठ वेतनश्रेणी लागू झालेल्या शिक्षकांना १ हजार ४०० रुपये वाढ मिळते, तर उच्च माध्यमिकमध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांना ८०० रुपयांची वाढ मिळते. माध्यमिक शिक्षकांना मात्र १०० रुपयांची वाढ केली जात असल्याचा सुळे यांचा आरोप आहे.या मागणीबाबतचे निवेदनही त्यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले आहे. हकीम समितीच्या शिफारशीनुसार, २००६ सालापासून ही वाढ लागू होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. परिणामी, पूर्वलक्षी प्रभावाने वाढ लागू केली नाही, तर आंदोलनाचा इशारा शिक्षक सेलने दिला आहे. (प्रतिनिधी)
माध्यमिक शिक्षकांची ग्रेड पे वाढीची मागणी
By admin | Published: September 15, 2015 2:41 AM