शहापूर : समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना पुलावरील ग्रेडर-मशिन कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात १० कामगार मृत्यूमुखी पडले असून ३ जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.
पडलेल्या मशिनखाली आणखी कामगार दबलेले असून त्यांना काढण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती शहापूर पोलिसांनी ''लोकमत'ला दिला. काम सुरू होते तेव्हा ३० ते ४० कामगार घटनास्थळी होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
काही दिवसांपूर्वीच झाला होता बस अपघात -समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होण्याचे नाव नाही. काही दिवसांपूर्वी, समृद्धी महामार्गावर एका खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने 25 जणांचा मृत्यू झाला होता. हा भीषण अपघात सिंदखेड राजा जवळ पिंपळखुटा फाट्याजवळ मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास झाला होता. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
टायर फुटल्याने रस्त्यावर उलटली होती बस अन्... -ही बस नागपूरवरून पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने ही मोठी जीवितहानी झालो होती.