पनवेल : महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती २०१८ पर्यंत संगणक प्रणालीने जोडणार, तसेच राज्यात २०१९ पर्यंत कोणीही बेघर राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी खारघर येथे केले. खारघर सेक्टर २१ मध्ये सिडकोने बांधलेल्या ग्रामविकास भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. राज्याच्या विकासात ग्रामीण भागाचा सहभाग महत्त्वाचा असतो. महाराष्ट्राच्या जलयुक्त शिवारसारख्या योजनांचे अनुकरण इतर राज्ये करीत आहेत. ग्रामीण भागात रस्ते झाल्यास गावात उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा पोहोचतील. दोन वर्षांत १७ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे १५ हजार विद्यार्थी खासगी शाळेतून जिल्हा परिषदेकडे वळले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. प्रत्येक जिल्ह्यात बचत गट, मॉल सुरू झाले पाहिजेत, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. ‘खेड्यांकडे चला’ हा गांधीजींचा मंत्र प्रत्यक्षात उतरायला ७ दशके लागली. ३०००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना ग्रामविद्युत सेवक दिले आहेत, तसेच खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी स्मार्ट ग्रामयोजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. कार्यक्रमात ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी ग्रामविकास भवनसह विविध योजनांची माहिती दिली. या वेळी रायगडचे पालकमंत्री प्रकाश महेता, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्रामपंचायती संगणकाने जोडणार
By admin | Published: January 03, 2017 4:54 AM