नागपूर: आज राज्यातील ग्राम पंचायतींचा निकाल हाती आला. आजच्या निकालात, भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठा विजय मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधून आनंद व्यक्त केला.
राज्यातील जनता आमच्या पाठिशीयावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'आजचा निकाल आमच्या बाजूने लागला आहे. मी याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अभिनंदन करतो. जी लोकं आमच्या सरकारला नावे ठेवत होती, स्वतः अपात्र असताना आमच्या सरकारला अपात्र म्हणत होते, त्यांना न्यायालयाने सांगितलेच, पण आज महाराष्ट्राच्या जनतेने सांगितलं की, जनता सरकारच्या पाठिशी आहे.'
'आजचा निकाल म्हणजे, गेल्या सहा महिन्यांच्या आमच्या कारभारावर ग्रामीण जनतेने दिलेली आम्हाला पसंती आहे. यामुळे मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात, शिंदे सरकार ग्रामीण जनतेच्या पाठीशी उभे राहिल आणि त्यांच्या इच्छा पुर्ण करेल,' अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
जनतेने विरोधकांना जागा दाखवून दिलीयावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, 'या निवडणूकीत राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमच्या सर्व आमदार-खासदारांनी खूप मेहनत घेतली. त्या सगळ्यांचे मी अभिनंदन आणि आभार मानतो. मागच्या वेळेस जेवढा विजय मिळाला होता, त्यापेक्षा मोठा विजय या निवडणुकीत मिळला आहे.'
'विरोधी पक्षाचे लोक शेतकऱ्यांना मदत दिली नाही, अशी ओरड करत होते. पण ग्रामीण भागातील लोकांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली. आजचा निकाल म्हणजे, आमच्या सरकारच्या कामाची पोचपावती आहे. मी नरेंद्र मोदींना धन्याव देतो. त्यांनी राज्याच्या विकासासाठी मोठी आर्थिक मदत केली, या सगळ्या कामाचा निकाल या निवडणुकीत पाहतोय. या पुढेही कामाचा धडाका चालू राहील,' असं शिंदे म्हणाले.