पुणे – राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कल हाती येत आहे. त्यात सर्वांचे लक्ष महायुतीला किती जागा मिळतील याकडे होते. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसले तरी स्थानिक पातळीवर पक्षातील नेत्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. त्यात महायुतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात लोकांनी कौल दिला आहे. भाजपा-शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला राज्यात सर्वाधिक ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. त्यातच अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात दादांचा दबदबा कायम राहिला असल्याचे दिसून आले आहे.
पुणे जिल्ह्यात पुतण्या काकांवर भारी पडल्याचे चित्र आहे. एकूण २२९ ग्रामपंचायतीपैकी १०९ ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे गेल्या आहेत. तर शरद पवार गटाला केवळ २७ ग्रामपंचायतीवर यश आले आहे. भाजपाला ३४, काँग्रेसला २५, शिवसेना शिंदे गटाला १० तर ठाकरे गटाला १३ तर इतरांनी ११ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी ग्रामीण भागात राष्ट्रवादीचं वर्चस्व होते. मात्र पक्षातील फुटीनंतर हे वर्चस्व कुणाच्या पारड्यात जाते याबद्दल उत्सुकता होती.
अखेर ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटाला १०९ ठिकाणी विजय मिळाला आहे. तर शरद पवार गटाला ५० च्या खाली समाधान मानावे लागले आहे. निवडणुकीच्या निकालात अजित पवार गटाने पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्यानंतर भाजपाने बाजी मारली आहे. अजित पवार विरोधी बाकांवरून सत्ताधारी पक्षाकडे आल्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीची ताकदही विभागली गेली. अजित पवारांना मानणारा मोठा गट त्यांच्यासोबत सत्तेत गेला. तर काही मोजकेच लोक शरद पवारांसोबत विरोधी पक्षात राहिले.
पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, याठिकाणी महापालिका, ग्रामपंचायतीसह विविध निवडणुकीत अजित पवारांचे वर्चस्व पाहायला मिळते. परंतु राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांना तितकी साथ पुणे जिल्ह्यात मिळणार का असा प्रश्न उभा राहिला होता. परंतु पुणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत विजय मिळवून अजित पवारांनी पुण्याचा दादा मीच असल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा सिद्ध केले आहे.