मुंबई – राज्यभरात २३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. त्यानंतर आज सकाळपासून ग्रामपंचायत निकालाचे कल हाती येत आहेत. त्यात प्रमुख लढत भाजपा-शिंदे-अजित पवार गट यांची महायुती आणि शरद पवार-उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची आहे. मात्र वंचित, मनसेसारखे इतर पक्षही ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा करिष्मा दाखवत आहेत.
सांगलीच्या शिराळातील सावंतवाडी ग्रामपंचायतीवर सलग चौथ्यांदा मनसेची विजयी घौडदौड कायम राहिली आहे. याठिकाणी सरपंचासह सर्व ८ ठिकाणी मनसेचे उमेदवार विजयी झाले आहेत. सांगलीत तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत आहे. तर अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील एरंडगांव भागवत या ठिकाणी मनसेचे ६ उमेदवार विजयी झालेत. तर सरपंचपदी मनसेचे गोकुळ भागवत यांची निवड झाली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील इगतपुरी तालुक्यात मोगरे इथं मनसेच्या प्रताप जोखरे यांची सरपंचपदी निवड झाली आहे.
तर नाशिकच्या निफाड तालुक्यातील जिव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचे झेंडा फडकला आहे. येथे सरपंचपदी संगीता गायकवाड यांचा विजय झाला आहे. पालघरच्या डहाणुतील राई ग्रामपंचायतीवर मनसेची सत्ता आली आहे. या ग्रामपंचायतीत सरपंचासह मनसेचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. पोलादपूर तालुक्यातील गोवले ग्रामपंचायत सदस्यपदी मनसेच्या सुजाता पार्टे निवडून आल्या आहेत. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेच्या सुजाता पालांडे यांनी बाजी मारली आहे. देवगड तालुक्यातील वानिवडे ग्रामपंचायतीत प्रभाग क्र. १ मधून मनसेचे निलेश राघव विजयी झालेत.
ग्रामपंचायत निकालात महायुतीचा डंका
राज्यातील २३५९ ग्रामपंचायत निकालात बहुतांश ग्रामपंचायतील सत्ताधारी महायुतीच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. या निकालात काँग्रेससह शरद पवार, उद्धव ठाकरे गटाची पिछेहाट झाली आहे. आतापर्यंत लागलेल्या निकालात ७८८ हून अधिक ग्रामपंचायती महायुतीने मिळवल्या आहेत. तर २९२ ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. तर इतरांना १६२ जागा मिळाल्या आहेत.