ग्राम पंचायत निवडणुकांत भाजपाने विजयी घोडदौड सुरु केली असून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात वेगाने निकाल जाहीर होऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात भाजपाने पाच ग्राम पंचायती ताब्यात घेतल्या आहेत. तर अनेक ग्राम पंचायतींवर भाजपा आघाडीवर आहे. दरम्यान उस्मानाबादमधून महत्वाची घडामोड हाती आली आहे.
उस्मानाबादमध्ये आपने खाते उघडले आहे. कावळेवाडी ग्राम पंचायत आपकडे गेली आहे. तर आंबेहोळ ठाकरे गटाकडे गेली आहे. गोपाळवाडी भाजपाकडे गेली आहे. आपचे मराठवाडा संयोजक ऍड. अजित खोत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले. तसेच सात पैकी 3 जागाही आपने पटकावल्या आहेत.
कोल्हापुर जिल्ह्यात पहिला निकाल हाती आला असून कागल तालुक्यातील हसन मुश्रीफ गटाला पहिला धक्का बसला आहे. बामणी ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. घाडगेंच्या राजे गटाने बाजी मारली आहे. बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या तीनही गावात भाजपचा झेंडा फडकला आहे. कागल तालुक्यात भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलानुसार भाजपा आणि शिंदे गट आघाडीवर आहे.
राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले. ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली आहे. आतापर्यंत राज्यातील मतमोजणीमध्ये भाजपा आणि शिंदे गटाला २६५ आणि मविआला २४३ ग्राम पंचायतींमध्ये आघाडी मिळाली आहे. यापैकी भाजपा १५५, शिंदे गटाला ११०, ठाकरे गटाला ७४, काँग्रेस ५५, राष्ट्रवादी ११४ आणि इतर १४३ अशी आघाडी मिळालेली आहे. हे सुरुवातीचे कल आहेत.