राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले. आज या सर्व ग्रामपंचायतींचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांत १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कोल्हापुरात भाजपाने राष्ट्रवादीला पछाडले असून हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये चार ग्रा. पंचायतींवर विजय मिळविला आहे. राज्यात भाजपा-शिंदे गट विरुद्ध ठाकरे-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी थेट लढत होत आहे. परंतू एक ग्राम पंचायत अशी आहे जिथे विचित्र आघाडी उभी ठाकली होती.
नांदेडच्या चिमेगावात एकनाथ शिंदे गट आणि काँग्रेसने आघाडी केली होती. या ग्राम पंचायतीचा निकाल हाती आला असून काँग्रेसचा सरपंच निवडून आला आहे. तर ग्राम पंचायतवर शिंदे-काँग्रेस आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. शिंदे गटाने काँग्रेसशी सलगी करून ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. या विचित्र आघाडीचीच अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यात चर्चा होत आहे.
कागल तालुक्यातील 26 ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी मध्ये पहिल्या टप्प्यातील रणदिवेवाडी, बामणी, कसबा सांगाव निढोरी या चार ग्रामपंचायतीवर भाजपने विजय संपादन केला आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सरपंच पदाचे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
करवीर तालुक्यात कावणे गावचा निकाल पहिल्यांदा जाहीर झाला. शुभांगी प्रतापसिंह पाटील भाजप सरपंचपदी निवडून आल्या असून येथे भाजपच्या चार तर काँग्रेसच्या पाच असे बलाबल निर्माण झाले असून भाजपने पहिल्याच निकालात खाते उघडले आहे