मुंबई - राज्यातील सुमारे ७१३५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. त्यामध्ये राज्यातील विविध भागातील कल समोर येत आहेत. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेनेही या निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात नाशिकमधील देवळा येथील वासोळ ग्रामपंचायतीमध्ये संभाजीराजेंच्या स्वराज संघटनेला पहिलं यश मिळालं आहे. स्वराज संघटनेने वासोळ ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकला आहे.
दरम्यान, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये सत्ताधारी भाजपा व शिंदे गट आणि महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलमध्ये चुरस दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदे गटाने ३६० ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर मविआने ३६३ ठिकाणी बाजी मारली आहे. तर १७० ग्रामपंचायतींवर इतरांनी कब्जा केला आहे.
राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ७४ टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेली होती, सदस्यांसह थेट सरपंचांची निवड करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी निकालानंतर सर्वच पक्षांकडून आपला उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला जात असल्याने या दाव्यांत कुठला पक्ष प्रबळ ठरतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.