मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील दुसºया टप्प्याचे मतदान १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. परंतु, या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन असल्याने ही तारीख बदलावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले की, १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे या दिवशी नागपूर दीक्षाभूमी आणि दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी जमा होतात. राज्य निवडणूक आयोगाने याच दिवशी मतदान जाहीर केल्याने मतदान टक्केवारीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तारीख बदलून दुसरी तारीख जाहीर करावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली. यासंदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक: निवडणुकीची तारीख बदलण्याची काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:24 AM