अमरावती - जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या १४६१ ग्रामपंचायत सदस्य आणि २५० सरपंचपदासाठी मंगळवारी जाहीर झालेल्या निकालाने भाजपाच्या पायाखालची वाळू घसरली. काँग्रेसचा सर्वत्र बोलबाला असून, आमदार वीरेंद्र जगताप आणि यशोमती ठाकूर यांचा करिष्मा याहीवेळी कायम राहिला. भाजपe शासनात शेतकऱ्यांचे होत असलेले हाल या निकालात प्रतिबिंबित झाले.
जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सर्व १४ तालुक्यांत सोमवारी मतदान पार पडले. मतमोजणी मंगळवारी तालुका मुख्यालयी पार पडली. मतमोजणीनंतर राजकीय पक्षांच्या दाव्या-प्रतिदाव्यांना ऊत आला. काँग्रेसने सरपंचपदासाठी १३४ जागांवर विजय मिळविल्याचा दावा जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी पत्रपरिषदेतून केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी सरपंचपदाच्या १३५ जागा पटकवल्याचा दावा केला. राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी एका आकड्याने सरस असल्याचे दावे होत असले तरी खरा कौल मात्र काँग्रेसच्याच बाजूने आहे.
राजकुमार पटेल यांचे कार्यक्षेत्र असलेल्या धारणी तालुक्यात भाजपाने आघाडी मिळविली. अंजनगाव-दर्यापूर तालुक्यांत भाजपाचे आमदार रमेश बुंदीले यांना काँग्रेसने जोरदार धक्का दिला. या दोन्ही तालुक्यांत काँग्रेस आघाडीवर आहे. मोर्शी-वरुड तालुक्यांत भाजपाचे आमदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाला यश आले नाही. तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी वर्चस्व कायम राखले. चांदूरचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी मतदारसंघातील चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत स्वनेतृत्व पुन्हा सिद्ध केले. अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यांत आमदार बच्चू कडंूच्या प्रहार संघटनेला यश आले.