विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या १६ जिल्ह्यांमधील ३१३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचे थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अधिक कसे निवडून आले यासाठी पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ही निवडणूक चिन्हावर झालेली नसल्याने या दाव्यात कितपत सत्य आहे, याविषयी संशय आहे.ग्रामपंचायत निवडणुकीविषयी ‘ज्याच्या हाती ससा, तो पारधी’ या न्यायाने दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यंदा प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवडला गेल्याने राजकीय दावेदारी सुरू झाली आहे. एकेका ग्रामपंचायतीवर एकापेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितल्याचेही दिसून आले. स्थानिक विकास आघाड्या स्थापन करून राजकीय जोडे बाजूला ठेवतही अनेक ठिकाणी निवडणूक झाली. अशा कोणत्याही पक्षाच्या नसलेल्या सरपंच अन् सदस्यांना आपल्या तंबूत आणण्यासाठी स्थानिक मोठे नेते कामाला लागले आहेत. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने निधी मिळण्याच्या आशेने भाजपासोबत जाण्याकडेही अनेकांचा कल दिसतो.एक हजारावर ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थक निवडून आल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केला आहे. प्रदेश काँग्रेसकडून सांगण्यात आले की, आम्ही जिल्ह्याजिल्ह्यांतून माहिती गोळा करीत आहोत. भाजपाचे दावे खोटे आहेत हे आम्ही आकडेवारीनिशी सिद्ध करू. पूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही माहिती देऊ. तर अनेक ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगले यश मिळाले असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. राज्यातील सरपंचांचा सत्कार सोहळा लवकरच आयोजित करून भाजपा शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक: सरपंचपदावर राजकीय दावेदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 4:10 AM