संतोष येलकर/अकोला: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतींमध्ये होणार्या ग्रामसभांमध्ये ग्रामविकास मंत्र्यांचा संदेश वाचून दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरपंचांना लिहिलेले संदेश पत्र जिल्हा परिषदेमार्फत सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पंचायत राज व्यवस्थेतील पायाभूत संस्थेचे प्रमुख व प्रथम नागरिक म्हणून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायातींच्या सरपंचांना लिहिलेल्या पत्राचे ग्रामसभांमध्ये वाचन करण्यात येणार आहे. या पत्रात ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेला संदेश ग्रामसभांमध्ये वाचून दाखविला जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनामार्फत ग्रामपंचायतींना मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होणार्या निधीचा विनियोग व संनियंत्रण प्रभावी व परिणामकारक होणे आवश्यक असून, ग्रामस्थांच्या गरजांच्या प्राधान्यक्रमानुसार या निधीचा वापर करणे अपेक्षित आहे, असे ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर पत्र ग्रामविकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांच्यामार्फत २२ जानेवारी रोजी जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले असून हे पत्र अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदांमार्फत संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकार्यांना पाठविण्यात आली. गटविकास अधिकार्यांकडून ग्रामविकास मंत्र्यांचे पत्र सरपंचांना पाठविण्यात आली आहेत. पाण्याचा ताळेबंद आराखड्यात सहभाग महत्त्वाचा!टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात यावर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये शिवारफेरी काढून, पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन गाव आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा आराखडा तयार करण्यासाठी सहकार्य करण्याचा संदेश ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे. भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीमुळे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ हेण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही कर प्रणाली ग्रामस्थांना समजावून सांगण्याचा सल्लादेखील ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना पत्राद्वारे दिला आहे.
'आमचा गाव आमचा विकास'साठी निधीचा वापर करा!'आमचा गाव आमचा विकास' उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने गावाच्या सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व घटकांचा सहभाग घेऊन योजनांचा निधी, स्वनिधी व चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करण्याबाबत ग्रामसभेत चर्चा करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्र्यांनी सरपंचांना लिहिलेल्या संदेश पत्रात केले आहे.