महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. जनता जनार्धनाने महायुतीच्या पारड्यात अतिप्रचंड बहुमत टाकले आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. यातच, पाच डिसेंबरला शपथविधीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यासह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. दरम्यान, सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे साधारणपणे 21 ते 22 खाती असू शकतील, असे वृत्त आहे.
महाराष्ट्र सरकारमधील जागावाटपासंदर्भात आज तकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 21 ते 22 खाती असू शकतात. यांत गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर विभागांसंदर्भात नंतर चरर्चा होणार असल्याचे समजते.
याशिवाय, राज्यातील नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 11 ते 12 मंत्री असतील. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्री पदे मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये 16 खाती मागितली आहेत. संबंधित वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार शपथ घेतील. हा शपथविधी पाच डिसेंबरला आझाद मैदानावर पार पडेल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रमुख उपस्थिती राहील.
कुणाला कोणतं खातं मिळू शकतं? -संबंधित वृत्तानुसार, भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषदाध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, 16 डिसेंबरपासून नागपुरात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनालाही सुरुवात होत आहे.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे तिनही नेते मुंबईत बैठक घेऊन नवीन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करणार आहेत. मात्र, कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अद्यापही खालावलेलीच असल्याने बैठका टळत आहेत.