मुंबई : ‘टेकफेस्ट’चा फिवर सगळीकडे चढला असताना आज शेवटच्या दिवशी प्रत्येकाच्या तोंडावर फक्त टेकफेस्टची चर्चा रंगलेली दिसली. टेकफेस्टच्या तिसऱ्या दिवशी स्पर्धांच्या ग्रॅण्ड फिनालेची धूम दिसून आली. या वेळी टेकफेस्टचा आनंद लुटण्यासाठी आज ६० हजारांहूनही अधिक टेक्नोसॅव्हींनी हजेरी लावली. त्यातही भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे टेकफेस्टच्या व्याख्यात्यांमधील आकर्षण ठरले. आयआयटी पवई संकुलात २ ते ४ जानेवारीदरम्यान टेकफेस्टच्या महाकुंभात अखेरच्या दिवशी कमालीच्या गर्दीची भर पडली. यात तंत्राधारित स्पर्धेप्रमाणेच कौशल्य जोखणाऱ्या स्पर्धांच्या अंतिम लढतीने कॅम्पस् बहरून गेले होते. सुसाट वेगाने धावणारी एफ-१, विविध प्रकारचे रोबो, तज्ज्ञांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम, स्पर्धा धूमधडाक्यात पार पडल्या. या खेळांची मज्जा लुटण्यासाठी शेवटच्या दिवशी राज्यासह देशाच्या अनेक भागांतून आणि परदेशातूनही मुंबईत दाखल झालेल्या ६० हजारांहूनही अधिक टेक्नोसॅव्हींनी टेकफेस्टकडे धाव घेतली. (प्रतिनिधी)
ग्रॅण्ड फिनाले धूम @ ‘टेक फेस्ट’
By admin | Published: January 05, 2015 6:25 AM